माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राजगड पोलिसांनी नसरापूर आणि परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची ऑन द स्पॉट कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जर या चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास त्या बाधित व्यक्तीला जागेवरच रुग्णवाहिका बोलावून थेट कोविड केअर सेंटरमध्ये त्यांची रवानगी करण्यात येत आहे. या मोहिमेचा रिकाम टेकड्यांनी याचा धसका घेतल्याने, त्यांची रस्त्यावरची लुडबूड मात्र थांबली आहे.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाधित रुग्णांची संख्या वाढत असून अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. तर अनेक व्यावसायिक वारंवार पोलिसांनी सूचना करून, कारवाई करूनही चोरून दुकाने सुरू ठेवत आहेत.
या पार्श्वभूमीवर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पुढाकाराने नसरापूर प्राथमिक आरोग्य विभागाच्या मदतीने हाती घेतलेल्या या मोहिमेत ७५ जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी एक जण बाधित आढळल्याने किमान दिलासा मिळाला आहे.
यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असल्याने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या रिकाम टेकड्यांवर वचक निर्माण झाल्याचे चित्र आहे. चेलाडी फाटा आणि बनेश्र्वर चौक ( तालुका भोर ) येथील रस्त्यावर अवघ्या चार तासांत पोलिसांनी ७५ जणांना अडवून आरोग्य यंत्रणेमार्फत त्यांची जागेवरच कोविड टेस्ट केली.
यामध्ये केवळ एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. तपासणी ठिकाणी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी उपनिरीक्षक निखिल मगदूम, हवालदार प्रमोद भोसले, कुंडलिक माने, भगीरथ घुले, रज्याक मनेरी, आणि नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापशिकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञच्या स्मिता वणवे, मोहिनी दिघे यांनी मोहिमेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांना आणि विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना लगाम बसावा यासाठी त्यांना पकडून त्यांची अँटीजन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राजगड पोलिसांनी घेतला आहे.
पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की, अनेक व्यावसायिक आणि नागरीक वारंवार सूचना तसेच कारवाई करूनही याचं उल्लंघन करत आहेत. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिकांची आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी सुरू केली असून यात पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधिताला कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य विभागाच्या मार्फत पाठवले जात आहे. तर परिसरातील कोणत्याही रस्त्यावर अचानक ही मोहीम राबविणार असल्याने नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केले आहे.











