इंदापूर च्या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील योजनांवर फार मोठा परिणाम होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होण्याची भिती केली व्यक्त
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी धरणातून ५ टीएमसी सांडपाणी उचलण्याची प्रस्तावित योजना मंजूर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातून या योजनेला राजकीय नेते तसेच शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील पाण्याच्या योजनांवर परिणाम होणार असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होईल,असे कारण सांगत तीव्र विरोध केला आहे.
माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लेखी पत्राद्वारे त्यांच्या अभ्यासानुसार तिव्र विरोध दर्शवला आहे.
आमदार बबनराव शिंदे यांनी पाठवलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, पुणे पिंपरी-चिंचवड शहरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशय मधून ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून खडकवासला कालव्याच्या किलोमीटर क्रमांक.१६१ मध्ये टाकण्याच्या कामास तत्वतः मान्यता कळविण्यात आलेले आहे. वास्तविक उजनी प्रकल्पाचे जलनियोजन यापूर्वीच झाले आहे.
सद्यपरिस्थितीत उजनी जलाशयांमध्ये कोणतेही अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही, तसेच भीमा खोरे हे तुटीचे खोरे आहे. वरील संदर्भीय विषयांमधील तत्वत मंजुरी दिलेली योजना ही पुणे शहराच्या सांडपाण्याचा पुनर्वापरातून तत्वत मान्य केल्याचे दिसते. सद्यपरिस्थितीत पुणे महानगरपालिके मार्फत मुंढवा येथे बंधारा बांधून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते व शुद्ध झालेले पाणी खडकवासला कालव्याच्या जुना मुठा कालव्यात सोडण्यात येते व उर्वरित सांडपाणी पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर, दौंड, बारामती या तालुक्यात करिता वापरण्यात येते.
वस्तुत या सांडपाण्याचा एकही थेंब उजनी जलाशयात येत नाही. त्यामुळे प्रस्तावित योजनेस उजनी धरणातून पाणी देणे व्यवहार्य होणार नाही.
सध्या उजनी जलाशयातील पाण्याचा वापर पूर्ण झाला आहे. तसेच मराठवाड्याला देखील ७.५ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. परत या योजनेकरिता पाच टीएमसी पाणी मंजूर केले, तर सोलापूर जिल्ह्यातील पाणी योजनांवर फार मोठा परिणाम होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होईल. त्यामुळे सदर योजनेला स्थानिक जनतेचा विरोध होईल.
आमदार शिंदे यांनी लेखी पत्रात म्हटल्याप्रमाणे
जर पुणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या व्यतिरिक्त ६.९० टीएमसी पाणी उपलब्ध होणार असेल, तर ते पुणे जवळून उचलून नजीकच्या खडकवासला कालव्यात सोडून प्रस्तावित योजनेला देण्यात यावे. त्यामुळे खर्चही कमी होण्यास मदत होईल व सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. तरी याबाबत उचित कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी विनंती लेखी निवेदनाव्दारे आमदार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.











