भिगवण : महान्यूज लाईव्ह
वयाची ९५ वर्षे..म्हणजे आयुष्यातले उन्हाळे, पावसाळे इतरांपेक्षा नक्कीच अधिक भोगले असणार…! या ९५ वर्षात बाप बनल्यापासून ते पोरं वयात येईपर्यंत त्यांना कधी काही कमी पडूही दिलंं नसेल… त्याकाळी कधी काही वेदना, संकटे आली, तर याच पोरांना छातीशी धरून त्या बापमाणसाने या संकटांना लढण्याची जिद्दही मिळवली असेल… अन याच बापमाणसाच्या खांद्यावरून पोटच्या गोळ्यांनी दुनियेतील बरेवाईट अनुभव शिकण्याचा धडाही गिरवला असेल… कळत्या वयात याच बापाने पोरांना चांगल्या लायनीला लावले असेल…त्यांचा प्रपंच सुरळीत करून दिला असेल…!! मग असे काय झाले? ज्यावेळी या बापमाणसाच्या आयुष्याचे पृथ्वीवरचे जन्मकार्य संपले, तेव्हा ही पोरं का लांब गेली असतील? का हरवली पाखरे म्हणत त्या बापमाणसाने आपला राखून ठेवलेला जीव आधीच सोडला असेल का? भिगवणमध्ये जेव्हा आज त्या ९५ वर्षाच्या माणसाने प्राण सोडला.. तेव्हा त्याच्या अंतिम प्रवासाला अखेर रक्ताच्या नात्याची नाही, परंतू रक्ताच्या नात्यापेक्षाही माणूसकीची नाती महत्वाची माणणारी तीन माणसे पुढे आली.. त्यांनीच खांदा दिला..आणि त्यांनीच भडाग्नीही…!
कोरोनाच्या काळात भीतीमुळे म्हणा किंवा अन्य कशाने, परंतू अंत्यसंस्काराच्या वेळी मागील वर्षी लोक दूर राहत होती.. आता यावर्षी बऱ्यापैकी जवळ येत आहेत..उपस्थिती लावत आहेत. मात्र अजूनही काहीजण तिकडे पाठच फिरवतात.. त्यापैकीच एक घटना भिगवण येथे घडली. भिगवण येथे उपचार घेणाऱ्या ९५ वर्षीय वृध्दाचा कोरोनाने मृत्यू झाला. तेव्हा कुटुंबातील इतरही कोरोनाबाधित असून उपचार घेत आहेत असे कुटुंबियांनी कळवल्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचारी पुढे आले. त्यांनी सर्व विधी केला. खरेतर काही नातेवाईक दवाखान्यात असतीलही, मात्र त्यापेक्षाही काही घरी असतीलच की, मात्र त्यांनी येणे टाळले आणि मग भिगवणचे ग्रामसेवक दत्तात्रेय परदेशी, अमोल वाघ, चालक सुहास पालकर, बाळू जगताप यांनी या वृध्दाची जबाबदारी घेत त्यांना खांदा दिला. स्मशानात चिताही रचली आणि शेवटचा विधीही त्यांनीच केला…!










