शशिकांत शिंदे यांनी केला या अमानुष कृत्याचा निषेध
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
मराठा आरक्षण रद्द केल्याच्या रागातून सातारा येथील युवकांनी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचे कोयना दौलत निवासस्थानाबाहेर शेणी पेटवून दिल्या, तर दुसरीकडे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. दगडफेक करणा-या युवकांना सातारा पोलीसांनी ताब्यात घेतले असून संबंधित युवकांची चौकशी सुरू आहे.
काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेल्या निर्णयामुळेच कदाचित काही युवकांनी हे कृत्य केले असावे असा अंदाज पोलिसांनी केला आहे. घटनास्थळावर पोलीस पोहोचले असून पोलीसांचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे साता-यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालावरसुद्धा दगडफेक करण्यात आल्याचे समजताच शशिकांत शिंदे तातडीने घटनास्थळावर दाखल झाले.
यावेळी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संबंधित युवकांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच संबंधित युवकांना भेटून जाब ही विचारला? तुम्ही हे असे का केले ? आम्ही सुध्दा मराठेच आहोत म्हणून तुम्हाला फक्त इथे आम्ही समजावून सांगण्यासाठी आलो आहोत असे म्हणत त्यांनी युवकांना जाब विचारला.
२४ तासाच्या आत आरोपीना अटक करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सुप्रीम कोर्टाच्या निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा काहीही संबंध नाही. पवारसाहेब व महाराष्ट्रातील सगळ्या पक्षाची भूमिका ही पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने होती, आहे व राहील. दुर्दैव म्हणजे वातावरण दुषित करून राजकारण करण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल तर राज्यसरकारने याची गंभीर दखल घ्यावी. आम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष या लढ्यात सामील होतो.
जाणीवपूर्वक एखाद्या पक्षाला जर कोणी टार्गेट करीत असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. हे कृत्य करणारे मराठे असतीलच असे नाही. कारण मराठे पाठीमागून वार करीत नाहीत. याच्यामागे कोण सूत्रधार आहे याचा शोध घेण्यात यावा. जाणीवपूर्वक काही तासापूर्वी हे नाट्य सुरु झाल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपने पूर्वी केलेला ठराव टिकला नाही. यात आमचा काय दोष ? मराठा आंदोलनात व लढ्यात आम्ही सामील आहोत व कायम असू. माझा आरोप आहे की, काही आमदार सभागृहात वेगळा मुद्दा मांडत होते. आरक्षण होऊ नये याबाबत राजकारण करत होते. ३७० ची घटना बदलण्याचा निर्णय केंद्राने घेतला, तसा तातडीने मराठा आरक्षणाच्याबाबत निर्णय घ्यावा आख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी राहील. आजपर्यंतच्या मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने निघालेले मोर्चे हे शांततेच्या मार्गाचे होते, पण काल दिनांक ५ रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील मराठा समाज जागा होऊन आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच राज्यात पंढरपूरसह अनेक ठिकाणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांचे उद्रेकरुपी स्वरूप पाहायला मिळाले आहे.
त्याची सुरुवात शिवाजी महाराजांची गादी असलेल्या राजधानी साता-यातून आजच्या घटनेच्या ठिणगीतून दिसून येत आहे. साता-यातील राज्याच्या गृहमंत्र्यांच्या घरासमोर शेणी जाळणे व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयासह राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केल्याच्या घडलेल्या घटनेने मराठा समाजातील एकी आणि जागृतीस ठेस पोहोचल्याने आज हा उद्रेक झाल्याचे या घटनेने दिसून येत आहे.











