बारामती : महान्यूज लाईव्ह
महिला शासकीय रुग्णालयानजीक असलेल्या नर्सिंग होस्टेलमधील कोविड सेंटरवर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून दाखल होण्यासाठी पैसे घेणाऱ्या व इंजेक्शन मिळवून देतो, त्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम सांगणाऱ्या एका डॉक्टरवर बारामतीत नुकतीच कारवाई करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सकांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते, त्यानुसार सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी या डॉक्टरची तेथील सेवा संपुष्टात आणत, तातडीने त्याची अन्य विभागात बदली केली.
बारामतीतील सरकारी दवाखान्यात डॉक्टरांपासून परिचारिकापर्यंत, अगदी कारकूनापर्यंत सारेजण जीवतोड मेहनत करुन कोरोनाच्या रुग्णावर उपचार करत असताना एक डॉक्टर मात्र उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी पैसे मागत होता. महिन्यापासून याची दबक्या आवाजात चर्चा होती, मात्र काही जणांनी या प्रकाराला वाचा फोडली आणि थेट वरिष्ठ स्तरावर तक्रार केली.
या डॉक्टरचे कारनामे वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचल्यानंतर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी हा प्रकार सरळ राजकीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून दिलेल्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी बारामतीत भेट दिली व या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेऊन चौकशी करण्याचे व कारवाई करण्याचे आदेश सिल्वर जुबली उप अशासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांना दिले.
काळे यांनी चौकशी करून संबंधित डॉक्टरला या ठिकाणाहून त्वरित हटवून त्याची अन्यत्र बदली केली. यासंदर्भात डॉ. अशोक नांदापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या डॉक्टरच्या संदर्भात काही तक्रारी होत्या, त्यानुसार बारामतीत भेट देऊन माहिती घेतली होती याची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले अशी माहिती दिली.
दरम्यान डॉ. सदानंद काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई केली असून लेखी पत्र देऊन, त्याची पूर्वीच्या विभागात बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील पुरावे थेट मिळाले नसले, तरी तक्रारींचे स्वरूप गंभीर असल्याने तातडीने ही कारवाई करण्यात आली असे त्यांनी सांगितले.
बारामतीत कोरोनाच्या रुग्णांना उपचारांमध्ये काहीही कमतरता राहू नये, यासाठी लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी जीवाचे रान करत असताना प्रशासकीय स्तरावरील एखादा कर्मचारी चुकीचे काम करत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. अशा कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्याचे तातडीने निलंबन झाले पाहिजे, तरच इतरांना धाक बसेल आणि नवा कोणी अधिकारी अथवा कर्मचारी असे काही काम करणार नाही अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञही करत आहेत.











