शहा यांच्या राजीनाम्याने इंदापूरच्या राजकारणात खळबळ
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले मजबुत स्थान असणारे इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक,इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी घरगुती कारण सांगत गुरुवारी (दि.२९) सकाळी आपल्याकडील विविध पदांचा राजीनामा दिल्याने इंदापूर च्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भरत शहा यांच्या राजीनाम्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला तसेच सहकार क्षेत्र व त्यांना मानणा-या हजारो समर्थकांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
भरत शहा हे हर्षवर्धन पाटलांचे एक विश्वासू व निकटवर्ती मानले जातात.मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या कडून भरत शहा यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.तर मी पक्ष कधीच सोडणार नाही. आजही मी पक्षासोबत आहे. मी माझ्या घरगुती अडचणीमुळे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मी सर्व पदाचा राजीनामा दिला असला तरी मी पक्षापासून दूर गेलो नाही. मी आजही माझ्या नेत्यासोबत आहे. आणि कायम असेल. समाजकार्य करायला पदांची गरज नसते त्यामुळे यापुढे ही कायम समाजकार्यात असेल. राजकारणात प्रत्येकालाचं कुठेतरी थांबावे लागते म्हणून मी थांबण्याचा स्वतःहून निर्णय घेतला आहे. मात्र नेत्याच्या खांद्याला खांदा लावून सोबत असेल,अशी प्रतिक्रिया भरत शहा यांनी दिली.
जेष्ठ नेते, माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांचे अत्यंत निकटचे सहकारी व त्यांच्या राजकीय सामाजिक कारकीर्दीचे साक्षीदार कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांचे भरत शहा हे पुतणे आहेत. सन २००६ पासून सलग पंधरा वर्षे ते इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे आहे.या बँकेच्या आर्थिक प्रगतीत शहा यांचा मोठा वाटा आहे.इंदापूर अर्बन बँक वाढवण्यामध्ये आणि त्याचे कामकाज सुरळीत व खातेदारांना वेगवेगळ्या सेवा सुविधा देण्यासाठी विषेश प्रयत्न केले.
भरत शहा हे गेल्या दहा वर्षांपासून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते कार्यरत आहेत. सन २०१२ ते २०१७ या कालावधीत ते इंदापूर उपनगराध्यक्ष होते. सन २०१७ पासून आजतागायत ते नगरसेवक म्हणून काम पहात आहेत. इंदापूर च्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांचे ते दीर तसेच इंदापूर तालूका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद शहा यांचे ते बंधू आहेत.
शंकरराव बाजीराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू असणारे गोकुळदास शहा यांचे पाटील कौटुंबासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाच्या जडण घडणेमध्ये शहा कुटुंबाचा मोठा वाटा आहे. इंदापूर नगरपरिषद यापंचवार्षिक मध्ये खेचून आणण्यात भरत शहा यांचा मोलाचा वाटा आहे.नगराध्यक्षपदी अंकिता मुकुंद शहा ह्या निवडूण आल्यामुळे इंदापूर नगरपरिषदेवर हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराची सत्ता तिसऱ्यांदा कायम राहीली.
सध्या भरत शहा व मुकूंद शहा तसेच नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या विचाराने चाललेल्या नगरपालिकेत आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस ची भक्कम ताकद असतानाही गेली साडेचार वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस ला एकही आंदोलन करता आले नाही. इंदापूर नगरपालिकेचे निम्म्याहून अधिक नगरसेवक असताना राष्ट्रवादीला शांत करण्याचा करिश्मा शहा बंधूंनी केला आहे.