बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील बाबुर्डी गावात काही दिवसांपूर्वीच सरपंच म्हणून ज्याची निवड केली त्या 24 वर्षीय पोराने गेल्या काही दिवसात गावाला असणारा सरपंच फक्त सरपंच नसतो तो कुटुंबप्रमुख असतो याची जाणीव करून दिली. आज तर पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत गाळ झाल्याचे समजताच, तो फक्त सहकाऱ्यांना सांगून बाजूला झाला नाही, तो स्वतःही टाकीत उतरला आणि टाकी स्वच्छ धुऊन घेतली!
तालुक्यातील बाबुर्डी येथील ग्रामपंचायत व गावठाण आला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची आज सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण जगताप, सुनील जगताप, गोरख खोमणे, पिंटू खोमणे, सचिन जाधव, योगेश जगताप, बंडू जगताप, राहुल खोमणे, नवनाथ खोमणे, राकेश जाधव, किरण खोमणे, तुषार जगताप, चिंतामणी शेंडे, मोहन जगताप, मिलिंद जगताप यांच्या सहकार्याने स्वच्छता केली.
गावची पाणीपुरवठ्याची टाकी म्हणजे फक्त सांगण्याचे काम नाही, तर स्वतःच्या कुटुंबाचे काम आहे असे समजून या सर्व युवकांनी स्वतः उतरून टाकीची स्वच्छता केली. टाकीची स्वच्छता केली म्हणजे फार मोठे काम केले असे नव्हे, परंतु छोट्या छोट्या गोष्टी देखील ही जबाबदारी नाही, तर आपले कर्तव्य आहे असे समजणारे पदाधिकारी गावात निर्माण झाले, तर गावच्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळू शकतो. हेच आज बाबुर्डी गावाने दाखवून दिले आहे.