माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर : कायदा धाब्यावर बसवून गोवंशाची कत्तल करून मुंबई येथे विक्रीसाठी तब्बल दीड टन गोमांस घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा गोरक्षकांनी सिनेस्टाईलने दुचाकीवरून पाठलाग केला व सातारा पुणे महामार्गावरील गोमांस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र यावेळी वाहनातील दोघेजण फरार झाले असून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे अंमलदार विजयकुमार नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारोळा ( ता. भोर ) येथील गावच्या हद्दीत महामार्गावर रामेश्वर पेट्रोलपंप येथे ही कारवाई करण्यात आली असून पिकअप वाहन व दीड टन गोमांस असे एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून फरार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे कार्यकर्ते निखिल खंडागळे ( रा. खंडाळा) या युवकाने फिर्याद दिली आहे. पुढील तपास किकवीचे सहायक फौजदार ए. बी. खोमणे करीत आहेत.
अधिक माहिती घेतली असता निखिल खंडागळे व ऋतिक पिसाळ यांना मुंबईकडे गोमांस विक्री करण्यासाठी वाहन जाणार असल्याचे समजले. त्यानंतर निखिल यांनी त्यांचे सहकारी अक्षय कोंडे, अजित कोंडे व राजू जानकर, अजय चिवे यांना बोलावून घेतले. खंडाळापासून पाठलाग करत असताना पिकअप चालकाने अन्य मार्गाकडे हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सारोळा येथील निरा नदीवरील पुलावर टेहळणी केली असता रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा बाजूकडून पांढऱ्या रंगाची पीकअप क्र. एम एच. ०१, सिआर ८९२९ जात असताना गाडीमधून पाणी पडत असताना चालकाला गाडी रोडच्या बाजूला घेण्याची सूचना केली. मात्र चालकाने गाडी वेगाने चालविली.
यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून पाठलाग केला असता पिकअप चालकाने सारोळा येथील रामेश्वर पेट्रोल पंपामध्ये गाडी उभी करून चालक व क्लिनर दोघे फरार झाले आहेत.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उभी राहिलेल्या गाडीजवळ जाऊन पाठीमागील हौद्यात पाहिले असताना त्यांना अर्थवट तुटलेले पाय, मुंडके आणि मांस आढळले. कार्यकर्त्यांनी राजगड पोलिसांना खबर दिल्यानंतर किकवी दुरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लडकत, नाना मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पीकअप किकवी दुरक्षेत्रमध्ये आणली.
हे गोमांस असल्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पशूवैद्यकीय डॉ. वेदपाठक यांना पाचारण केले असता, डॉ. वेदपाठक यांनी मांसाची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी गोमांस असल्याचे सांगितले. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी किकवी ग्रामसेवक अधिकारी यांच्या ताब्यात दिल्यानंतर गोमांस नष्ट करण्यात आल्याचे उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी सांगितले.
दरम्यान, पिकअप गाडीचा पाठलाग करत असताना निखिलच्या दुचाकीला पिकअप चालकाने ठोस मारली. सुदैवाने अनुचित घटना घडली नाही. तब्बल दिड टन गोमांस घेऊन जाणारा पिकअप हा फलटण येथील बाबा नावाच्या कत्तलखान्याचा असल्याचे समजते. गोवंशाची कत्तल नेमकी कोठे केली आणि विक्री कोठे करणार याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.