महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
येत्या एक मेपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Central government, government, Narendra Modi, covid- 19)
देशातील सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण तातडीनं व्हावं या दृष्टीने हा निर्णय घेतला असून, दोन दिवसापूर्वीच इस्राईल या देशाने आपल्या देशातील 53 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करून हा देश कोरोनामुक्त असल्याचे घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जगातील दुसर्या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या देशात म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू आहे.
या लसीकरणाला बळ देतानाच जास्तीत जास्त वाढत चाललेल्या कोरोना बाधित रुग्णसंख्येला अटकाव करण्याचा देखील हा मोठा प्रयत्न असणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध तज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी तसेच औषध कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. यामध्ये कोरोनाच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये कंपन्यांना खुल्या बाजारात लस विकण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे एक मेपासून देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही लसीकरणाच्या टप्प्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.