विशाल कदम : महान्युज लाईव्ह
लोणी काळभोर : मित्रानेच हॉटेलवर जेवायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने निवृत्त शिक्षकाच्या घरी पावणेदोन लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत उघड झाली. आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या ४८ तासाच्या आत पकडून बेड्या ठोकल्या आहेत.
रवींद्र शेषराव अवधूत (वय- ४५, रा. आगळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निवृत्त शिक्षक मोहन पंढरीनाथ ढोणे (वय- ६१, रा. मानस सरोवर सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली ) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र अवधूत हा मोहन ढोणे यांच्या परिचयाचा होता. ७ फेब्रुवारीला आरोपीने घरी येऊन मोहन व त्यांच्या पत्नीला उरुळी कांचन येथील एका हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला होता. जेवायला बसल्यानंतर आरोपी रवींद्र याने तुम्ही या ठिकाणीच बसा. मी माझ्या मुलांना जेवायला घेऊन येतो. असा बहाणा करून रवींद्र हॉटेलमधून मुलांना आणायला गेला.
आरोपी रवींद्र याने हॉटेलमधून निघून गेल्यानंतर तो स्वतःच्या घरी न जाता मोहन ढोणे यांच्या घरी गेला. त्याने घराचा दरवाजा एका नकली चावीच्या साहाय्याने उघडून घरामध्ये प्रवेश केला. रवींद्रने घरामधील कपाटाचे लॉक तोडून त्यामधील सोने आणि चांदीचे दागिने असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज घेऊन तेथून मुलांना आणण्यासाठी त्याच्या घरी गेला.
त्याने मुलांना घेऊन परत मोहन ढोणे हॉटेलमध्ये बसलेल्या हॉटेल मध्ये गेला. जेवण झाल्यानंतर रवींद्र अवधूत व मोहन ढोणे आपापल्या घरी निघून गेले. दरम्यान, मोहन ढोणे हे घरी गेले असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेल्या स्वरूपात आढळून आला.
घरात जाऊन पाहणी केली असता कपाटात ठेवलेले पाऊने दोन लाख रुपयांचे दागिने मिळून आले नाहीत. यावरून आपल्या घरातील दागिन्यांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना रवींद्र याने डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने दरवाजा उघडून घरामध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले.